विविधा : भालजी पेंढारकर

-माधव विद्वांस

उद्या मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक चित्रतपस्वी भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर जयंती. त्यांचा जन्म उच्चशिक्षित घरामध्ये 2 मे 1898 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील कोल्हापुरातील नामांकित डॉक्‍टर होते. आपला मुलगा डॉक्‍टर व्हावा किंवा त्याने चांगले शिकावे असेच त्यांना वाटले असणार, पण त्यांचे अभ्यासापेक्षा खेळातच जास्त मन रमत असे.

पालकांची शिक्षणाची अपेक्षा पूर्ण करता येत नाही म्हणून ते घरातून बाहेर पडले. घर सोडल्यावर सुरुवातीला त्यांनी काहीकाळ पुण्यातील एका वृत्तपत्रात नोकरी केली. तसेच मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये नोकरी केली. त्यानंतर ते आपल्या आवडीच्या विषयाकडे, नाटकाकडे वळले व नाटकलेखन करू लागले व जवळ जवळ त्यांनी 6 नाटके लिहिली. ते नाटकातही काम करू लागले.

त्यांनी दरम्यानच्या काळात कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी एका चित्रपटाचे लेखन केले, पण तो चित्रपट पडद्यावर आलाच नाही त्यांनी कंपनी सोडली. त्यानंतर त्यांनी पृथ्वीवल्लभ दादासाहेब तोरणे आणि पै यांच्या सहकाराने चित्रपटाची योजना आखली. या चित्रपटाचे पटकथालेखन आणि रंगभूषा यांबरोबर त्यात त्यांनी अभिनयही केला. या चित्रपटाच्या यशामुळे बाबांचे पटकथा लेखनाचे काम वाढले. पण त्यांची झेप लेखनापुरती मर्यादित नव्हती. त्यांना दिग्दर्शन करायचे होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित “श्‍यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यांच्यातील दिग्दर्शक चंदेरी दुनियेला समजला. दरम्यानच्या काळात भालजी अभिनयही करीत होते.

भालजींचे दोन विवाह झाले होते. वर्ष 1930 मध्ये त्यावेळी महारथी कर्ण व वाल्मिकी या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. लीलाबाईचा हा दुसरा विवाह होता. त्यांना पहिली दोन मुले होती, एक मुलगा व एक मुलगी ती भालजींनी दत्तक घेतली. पुढे या मुलीने कादंबरीकार रणजित देसाई यांच्याबरोबर विवाह केला. ही मुलगी म्हणजेच “नाच ग घुमा’ हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका माधवी देसाई होय. भालजी यांना कोल्हापूरच्या छत्रपतींनी मराठी चित्रपटनिर्मितीसाठी कोल्हापुरातील बेलबाग परिसरातील 13 एकर जागा दिली. याठिकाणी भालजींनी स्टुडिओ उभारून अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली.

जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूरचे एक वैभव झाले. परंतु 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. या आगीत नुकतेच तयार झालेले “मीठभाकर’ आणि आणखी एक चित्रपट भक्ष्यस्थानी पडले. भालजींनी फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेप घेऊन जयप्रभा पुन्हा परत उभा केला. पुन्हा “मीठभाकर’ व “मेरे लाल’ची र्निर्मिती केली. “मीठभाकर’ने त्यांना आर्थिक हातभार लावला व पुन्हा भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रपट निर्मितीस जोमाने सुरुवात केली.

भालजींनी ऐतिहासिक चित्रपट निर्मितीवर भर दिला होता. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील व्यक्‍तिरेखांवर त्यांनी चित्रपट काढले. चित्रपटातून प्रेक्षकांना चांगला संदेश मिळावा यावर त्यांचा कटाक्ष असे. जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. जयप्रभा स्टुडिओ एक कुटुंब म्हणून त्यांनी वाढविले. भालजींच्या शिस्तीतून सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार तयार झाले.

वर्ष 1991 मध्ये चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता येणे शक्‍य नव्हते, म्हणून तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अजित पांजा आणि मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खास कोल्हापूरमध्ये येऊन जयप्रभा स्टुडिओमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. भालजी पेंढारकरांनी 26 नोव्हेंबर 1994 रोजी आपली जीवनयात्रा संपविली. चित्रतपस्वीस अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.