पाण्यासाठी संतप्त सातारकरांचा रास्तारोको

अद्याप निळ्या कनेक्‍शनचे पाणी नाही

माची व गुरुवार पेठेच्या डोंगर उतारावरच्या भागाला अद्याप निळी पाईपचे कनेक्‍शन मिळालेले नाही. दोन्ही पेठा मिळून साधारण सव्वापाच हजार लोकवस्ती आहे. मात्र प्राधिकरणाने तब्बल चौदा हजार निळ्या पाईपचे कनेक्‍शन देऊनही या भागाला ही वितरण प्रणाली देऊ शकणारा ठेकेदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मिळालेला नाही. पालिकेने सर्व तांत्रिक मंजुरी घेऊनही प्राधिकरणाला येथे काम करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र वार्षिक दर मंजुरीच्या घोळात जुन्या दराप्रमाणे काम करणारा ठेकेदार मिळत नसल्याने प्राधिकरणाकडून हे काम रेंगाळल्याची माहिती आहे. या परिसरात तीन मजली इमारती, दुमजली घरे असल्याने पुरेशा दाबाअभावी पाणी वरच्या मजल्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर होतो. त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सातारा  – कास तलावाचा पाणीसाठा सात फुटापेक्षा कमी झाल्याने सातारा शहरात पाणीबाणी सुरू झाली आहे. 221 गुरुवार पेठ येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीच येत नसल्याने येथील संतापलेल्या नागरिकांनी बोगदा मार्ग अडवून धरला. पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत घातली व तातडीने टंचाईग्रस्त भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

केसरकर पेठ व गुरुवार पेठ यांच्या सीमारेषेवर शीतल बंगल्यासमोरील डोंगर उतारावरच्या भागावर सुमारे अडीच हजार लोकवस्ती आहे. माची व गुरुवार या दोन्ही पेठा डोंगर उतारावर असल्याने उन्हाळ्यात चढाकडील घरांना पाण्याची नेहमीच टंचाई जाणवते. या भागाला गुरुवार बाग येथील मेळवणे जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी 221 गुरुवार पेठ येथे पाणीच न आल्याने संतापलेल्या नागरिक व महिलांनी सकाळी नऊ वाजता अचानक बोगद्याला जाणारा रस्ता अडवून धरला. त्यामुळे सुमारे अर्धा तास ट्रॅफिकचा खोळंबा झाला. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पालिकेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, अभियंता गाढवे व लिपिक नंदू कांबळे घटनास्थळी हजर झाले.

पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी पाणी मिळत नसल्याने चांगलेच फैलावर घेतले. कास तलावाची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा सक्षमपणे करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीकांत आंबेकर यांनी केले. जलवाहिन्या चोकअप झाल्याची तक्रार नागरिकांनी करत ती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली. आंबेकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे आदेश दिले. या भागाला तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.