पुसेगाव – पुसेगावमध्ये सध्या जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. नेर तलावातून आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची काही विरोधक तोडफोड करत असल्याने गावाला पाणीपुरवठा करण्यात अडचणीत येत आहेत; परंतु ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस झटून, तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा करत आहेत.
तालुक्यातील इतर गावांपेक्षा पुसेगावाला पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचा पोटशूळ उठल्याने विरोधक गावाची व प्रशासनाची स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कांगावा करत असल्याचा आरोप सरपंच घनश्याम मसणे यांनी केला आहे.
खटाव तालुक्यात गावोगावी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. कित्येक गावांमध्ये दहा-पंधरा दिवसातून एकदा, कसाबसा पंधरा-वीस मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पुसेगावात काही अडचण न आल्यास तीन-चार दिवसातून एकदा, किमान तासभर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलजीवन योजनेसाठी खोदकाम करताना पाइपलाइन फुटत आहेत.
नेर तलावातून आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची काही विरोधक हेतुपूर्वक तोडफोड करत आहेत. त्याचे लिकेज काढणे, दुरुस्ती करणे यात कर्मचार्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना एखाददुसरा दिवस मागेपुढे झाल्याने अडचणी येत आहेत. त्याचे काही विरोधक गलिच्छ राजकारण करत आहेत. हा प्रकार विरोधकांनी तात्काळ थांबवावा, असा इशारा मसणे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाल्या आहेत. कारभार समजून घेण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. नव्याने कारभार घेतलेल्यांचा तात्काळ राजीनामा मागणे, हे बालिशपणाचे आणि हास्यास्पद आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले.