डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावास सुरुवात

पुणे – ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळिंबाचा समावेश केल्यानंतर सोमवारपासून (दि.17) प्रत्यक्ष ऑनलाइन लिलावास सुरुवात झाली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी ऑनलाइन लिलावास विरोध केला. मात्र, प्रशासक बी. जे.देशमुख यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून ई-नाम योजनेविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसण केले.

पणन संचालकांनी नुकतीच ई-नाममध्ये सहभागी झालेल्या बाजार समित्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पुणे बाजार समितीत कांदा, बटाटा आणि डाळिंब हा 100 टक्‍के शेतीमाल हा शेतकऱ्यांचा असल्याने या शेतीमालाचा लिलाव ई-नाम अंतर्गत करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने पहिल्या टप्प्यात डाळिंबाचा समावेश करून ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेनुसार मागील काही दिवसांत डाळिंब आडत्यांना ऑनलाइन लिलावाबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखविली. त्यानंतर खरेदीदार, शेतकरी, आडते यांच्या माहिती संकलित केली असून बाजारात नव्याने येणाऱ्या घटकांचा यात समावेश करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.