Lok Sabha Elections 2024 – भाजपने राज ठाकरे यांना प्रचारात उतरवून भविष्याचा गेम प्लॅन केल्याचे सध्या दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सध्या अध्यक्ष जरी असले, तरी नजीकच्या काळात राज ठाकरे हे जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होऊ शकतात, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आफ्टर लोकसभा आणि बिफोर विधानसभा म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे मनसे विलीन करुन अध्यक्ष होणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का, हे मला जाणवायला लागले आहे.
जर असे घडले तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष भविष्यात उभा राहू शकतो. त्यावेळी ती अस्तित्वाची लढाई असेल, असेही आंबेडकरांनी नमूद केले.
जरांगेंसोबत विधानसभेला युती शक्य
प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबतच्या युतीवरही भाष्य यावेळी केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही मनोज जरांगे यांना युतीचा प्रस्ताव दिला होता, पण सध्या ती युती होऊ शकली नाही. पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होऊ शकते, असेही ते म्हणाले.