प्रतापगड, (उत्तर प्रदेश), – उत्तर प्रदेशात अपक्ष उमेदवार आणि माजी मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजाभैय्या आणि अन्य 17 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समाजवादी पार्टीच्या मतदान प्रतिनिधीला मारहाण केल्याबद्दल या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय दंड संहिता आणि ऍट्रॉसिटीच्या विविध कलमांखाली कुंडा पोलीस ठाण्यामध्ये या सर्वांविरोधातील प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात काल पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यावेळी समाजवादी पार्टीच्या मतदान केंद्र प्रतिनिधीला जनसत्ता दल लोकतांत्रिक या स्थानिक पक्षाच्या मतदान केंद्र प्रतिनिधीने तेथून निघून जाण्यास सांगितले.
मतदान केंद्र ताब्यात घ्यायचे असल्यामुळे ही सूचना करण्यात आली होती. मात्र सपाच्या प्रतिनिधीने नकार देताच राजाभैय्या आणि अन्य सहकाऱ्यांनी या प्रतिनिधीला वाहनात कोंबून दुसरीकडे नेले आणि मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले.