डिंभे/मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलाच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. संबंधित महिलेच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला येरवडा कारागृहात रवाना करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबधित महिलेचा मुलगा घोडेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होता. त्यावेळी संबंधित महिला रुग्णालयात आली आणि रुग्णालयातील डॉ. प्रिती खंडु डामसे (वय 32) या वैद्यकिय काम करीत असताना त्यांना मारहाण करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला.
तसेच सुरक्षारक्षक काळुराम नागु सुपे, जिजाबाई काळुराम लाडके यांनाही मारहाण करुन शिवागाळ, दमदाटी करून जखमी केले.तसेच रुग्णालयातील साहित्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर साहित्य तोडुन, फोडून शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले आहे.
रुग्णालयामध्ये भांडणे सुरू असताना संबंधित महिलेचा मुलगा विधिसंघर्षग्रस्त बालकाने फेसबुक लाइव्ह करुन मी ग्रामीण रुग्णालयाच्या टेरेसवर जावून आत्महत्या करतो, अशी धमकी दिल्याचे याप्रकरणी डॉ. प्रिती डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले. पुढील तपास महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक मनिषा तुरे करीत आहेत.