तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकाच्या वळणावर शनिवारी (ता. १३) सकाळी भूमिगत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरले होते. परिणामी रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता.
गेल्या दहा दिवसांपासून येथील सांडपाणी वाहिनी तुंबून रस्त्यावर पाणी पसरत आहे. या ठिकाणी पाण्याच्या वाहिनीसाठी खोदाई करण्यात आली होती. खोदाई करताना भूमिगत सांडपाणी वाहिनीत माती जाऊन ती तुंबली आहे. नागरिक व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथून वाहने वेगात जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. परिणामी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. तसेच पाणी आणि मातीमुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. आरोग्य विभागाने येथील तुंबलेल्या सांडपाणी वाहिनीचे साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.