कृषीपंप बंदसाठी केराची टोपली

कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसाठा तळाला : प्रशासनाची माणुसकी थिजली

शिरूर – शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात तुटपुंजा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरावर जलसंकट आले आहे. घोडनदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामधून पाणी उपसा होत असल्याचे अहमदनगर व पुणे जिल्हाधिकारी तसेच शिरूर व पारनेर तहसीलदार यांना सांगून या कृषीपंप बंद करण्याची मागणी केली; परंतु या निवेदनाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शिरूर शहरांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.

शिरूर शहराला नगर परिषदेच्या वतीने आता तीन दिवसांनी पाणी येणार असल्याचे सांगितल्याने नागरिकांचे मोठे हाल होणार आहे. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शिरूर शहराला पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी आहे. नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाणी कर घेतला जातो. सध्या धरण क्षेत्रामध्येही पाणीसाठा शिल्लक राहिला नसल्याने कुठलेही आवर्तन नगर परिषदेस मिळणार नाही. आलेले पाण्याचे आवर्तन दोन-तीन महिने पुरेल एवढे असताना मात्र हे आवर्तन 20 दिवसांतच कसे संपले गेले? शिरूर नगरपरिषदेच्या घोड नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात शेतीसाठी व पारनेर तालुक्‍यातून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणी उपसा केला आहे. याबाबत नगर जिल्हाधिकारी व पारनेर तहसीलदार यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असून शिरूरचे पाणी पळवून नेले आहे. शिरूरच्या बाजूने शिरूर पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला आहे. त्यामुळे हे पिण्याचे पाणी संपले असून याला जबाबदार पुण्याचे जिल्हाधिकारी व शिरूरचे तहसीलदार असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे. नगर व पुणे येथील दोघे जिल्हाधिकारी व पारनेर शिरूरचे तहसीलदार हे पाण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या घोडनदी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात 17 मेपर्यंत 70 टक्‍के पाणी आले होते. हे पाणी फक्‍त पिण्यासाठीच शिरूर शहरासाठी वापरले जाणार होते; परंतु याबाबत या बंधाऱ्यात बाजूने असणाऱ्या पारनेर व शिरूरकडील शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला आहे.

जादा टॅंकरने पुरवठ्यामुळे पाणी संपले
शिरूरजवळ घोडनदी बंधाऱ्याजवळ असणाऱ्या पारनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतीमध्ये एक विहीर पाण्यासाठी अधिग्रहण केली आहे. या विहीरीमध्ये शिरूरच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणीउपसा केला गेला. यातून पारनेर तालुक्‍यातील गावांना पाणी त्यासाठी टॅंकर भरण्याची सोय केली. रोजचे 70 ते 100च्यावर पाण्याचे टॅंकर या ठिकाणाहून भरत आहेत. जे पाणी टॅंकर भरत आहे, त्याच्यामध्ये काही खासगी टॅंकरही असल्याची चर्चा आहे.

पावसाने ओढ दिल्यास पाणीबाणी
शिरूर शहरामध्ये सध्या नागरिक पाण्याने त्रस्त झाले आहेत. जर शिरूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा झाला होता, तर मग हे पाणी शेतीसाठी कसे उपसले गेले? एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये एकीकडे जिल्हाधिकारी सांगतात की, पिण्याचे पाणी राखून ठेवा आणि दुसरीकडे या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी ते कमी पडले आहेत. यापुढे आठ ते पंधरा दिवस किंवा महिनाभर पावसाने ओढ दिली तर शिरूर शहरात पाणीबाणी होण्याची शक्‍यता आहे.

टॅंकर माफिया वाढणार
शिरूर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता; परंतु हे पाणी अगोदर उपसा केले आहे. आता रास्ता रोको आंदोलन करून काही उपयोग नाही. कारण धरण क्षेत्रात आता पाणी नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने जे अधिकारी या पाणी उपशास जबाबदार आहेत. त्यांच्यावर पोलीस स्टेशन येथे खटले दाखल करणे गरजेचे आहे. आता शिरूर शहरामध्ये टॅंकर माफियांची चलती सुरू होणार असून, नगर परिषदेच्या वतीने ही पाण्याचा टॅंकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.