पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बारामती- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या पुणे जिल्ह्यातील 12, पुणे शहर आयुक्तालय 2, पिंपरी चिंचवड आयुक्तालय 1, सातारा जिल्हा 1, सोलापूर जिल्हा 1 अशा एकूण 17 गुन्ह्यांतील फरारी असलेला अट्टल गुन्हेगार अमोल उर्फ लखन विलास देशमुख (वय 29, रा.यवत, ता.दौंड, सध्या रा. खंडोबानगर, बारामती) याला बारामती-मोरगाव रोड, ढवाणवस्ती येथून ताब्यात घेतल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडण्याकामी विशेष मोहिम राबविण्याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने शिक्रापूर, दौंड, लोणीकाळभोर, लोणीकंद, वडगाव निंबाळकर, जेजुरी, वानवडी, हडपसर, चाकण, फलटण, अकलूज या पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या एकूण 17 गुन्ह्यात दोन वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्डवरील आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख याची माहिती काढली असता तो दिनांक 2 ऑगस्ट 2019 रोजी गणेश उत्सवासाठी बारामती येथे येणार असल्याची समजले. पोलिसांनी सापळा रचून फरारी आरोपी देशमुख याला सिनेस्टाइल पाठलाग करुन ताब्यात घेतले. आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली यापूर्वीच त्याच्या साथीदाराकडून हस्तगत केलेल्या आहेत. आरोपीस पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.