34 चर्चासत्रांत सहभाग : चार खासगी विधेयके मांडली
जळोची- लोकसभा सदस्य म्हणून, सलग तिसऱ्यांदा काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. सोळाव्या लोकसभेप्रमाणेच या सतराव्या लोकसभेतही अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी संसदेत आपल्या कामाचा ठसा उमटवायला सुरुवात केली असून पहिल्याच अधिवेशनात त्यांनी 34 चर्चासत्रात भाग घेत 109 प्रश्न उपस्थित केले आहेत, तर चार खासगी विधेयकेही पटलावर सादर केली आहेत.
सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनातील खासदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर झाला आहे. यात विद्यमान खासदारांपैकी खासदार सुप्रिया सुळे आणि हीना गावित या दोन महिला खासदारांचे काम उल्लेखनीय असल्याचे म्हटले आहे. त्यातही सुळे यांनी सर्वाधिक 34 चर्चासत्रांत भाग घेत तब्बल 109 प्रश्न सरकारला विचारले आहेत. याशिवाय चार खासगी विधेयकेही त्यांनी सादर केली आहेत. सुळे यांच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पर्यायाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज पुन्हा एकदा संसदेच्या आवारात उमटला आहे.
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सादर केलेल्या खासगी विधेयाकांमध्ये युवा कौशल्य प्रशिक्षण विधेयक’, कंपनी (सुधारणा) विधेयक’, भारतीय टपाल सेवा (सुधारणा) विधेयक’ आणि शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य विधेयक’ या चार खासगी विधेयकांचा समावेश आहे. याशिवाय दुष्काळ आणि पाणीटंचाई’, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे हित जोपासणे’, दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडणे’, रेल्वेच्या जमिनींबाबत निर्णयाचा अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देणे’, गेल्या महिन्यात कदम वाकवस्ती येथे झालेला भीषण अपघात’, दौंड रेल्वेला उपनगराचा दर्जा देणे’, आदी महत्त्वाचे विषय घेत एकूण 109 प्रश्न सुळे यांनी सरकारला विचारले आहेत.