बारामती( प्रतिनिधी) : बारामती शहरात एका दिवसात कोरोनाचे 18 रुग्ण सापडले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती बंद होणार ही चर्चा संपूर्ण शहरात सुरू होती. मात्र बारामती सुरूच राहणार असून बाजारपेठेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असलेली दुकाने सोमवार पासून सकाळी ९ ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनामुक्त शहर म्हणून बारामती ने ओळख निर्माण केली होती मात्र शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात शहरात १८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहरात लॉकडाऊन होईल अशी शक्यता नागरिक वर्तवत होते.मात्र बारामती सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत बारामतीच्या बाजार पेठ सुरू राहणार आहेत.
पुणे शहर पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागात सोमवारपासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती शहर देखील बंद राहणार की काय याबाबत नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या लॉकडाऊन बाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र बारामती सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.