राहू : दौंड तालुक्यातील बागायती पट्टा असलेल्या राहू बेट परिसरात उष्णतेच्या लाटेमुळे कामकाजाच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे हिरवाईने आणि बागायती क्षेत्र असलेल्या बेट भागात शेतकरी, नागरिकांना कामांच्या वेळेत बदल करावा लागत आहे.
दिवसा प्रचंड उकाडा जाणवत आहे. काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागतील मजूर व शेतकऱ्यांनी रोजच्या कामकाजाचे वेळापत्रकच बदलले आहे. मजुरी करणारा व्यक्ती पूर्ण दिवस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत काम करण्यापेक्षा सकाळी सात ते एक वाजेपर्यंत मजुरीसाठी जात आहे. जेणेकरून कमीत कमी उन्हाचा तर होईल. हे संबंधित मालकाला मान्य नसेल तर तो मजुरीलाच जात नाही. शेतकरी देखील शेतातील अनेक प्रकारची कामे ही पाहत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रखर उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ग्रामीण भागातील सर्वच महिला आजही जुन्या जुन्या पद्धतीनुसार कुरडया, पापड्या, वडे, सांडगे, शेवया हे विकत न आणता जुन्या पद्धतीने घरगुती करीत असतात. परंतु त्यांना उन्हाचा चांगला फायदा होत आहे. हे पदार्थ सकाळी दहा वाजेपर्यंत केले जात आहेत. दहाच्या नंतर प्रखर उन्हाला सुरवात होते. हे पदार्थ चांगले वाळत आहेत. त्यामुळे या पदार्थांची शुद्धता चांगल्या प्रकारे राहत आहे.
मंदिरात क्षणभर विश्रांती
उन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक अघोषित संचारबंदी ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत अनेक तरुण, ज्येष्ठ व्यक्ती घरी न थांबता मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी गारव्याला वेळ घालवत आहे. त्यातूनच पत्त्या, सोंगट्या आदी खेळांचे प्रकार मनसोक्त खेळले जात आहेत.
म्हशी डुंबतात दिवसभर पाण्यात
ग्रामीण भागात पशूधनामध्ये म्हशींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हशींचे दूध हे खूप घट्ट व शरीरासाठी चांगले असते. परंतु म्हशींच्या शरीररचनेनुसार त्यांना उष्णता अजिबात सहन होत नाही. शरीरावरील जाड कातडी, काळा रंग, आदींमुळे त्या उष्णता सहन करू शकत नाही. पर्यायाने म्हशी सकाळी अकरापासून सायंकाळपर्यंत अक्षरशः पाण्यात डुंबत आहेत. शेतकऱ्यांनी कितीही पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी कितीही धोपाट्या घातल्या तरी त्या पाण्याबाहेर येत नाही.