बारामती – इंदापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

पिंपळी येथे बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

भवानीनगर-येथील बारामती – इंदापूर रस्त्यावर पिंपळी (ता. इंदापूर) या ठिकाणी अनेकांनी रस्त्याच्या कडेला असलेली व्यवसायिक अतिक्रमणांवर बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शनिवारी (दि. 1) कारवाई करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी दहा वाजता पिंपळी येथील असलेल्या निरा डाव्या कालव्याच्या फुलापासून ते बारामतीपर्यंत रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलेल्या सर्व हॉटेल व्यावसायिकांवर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपविभागीय अभियंता विश्‍वास ओव्हळ, कनिष्ठ अभियंता उदय नांदखिले, सौरभ देसाई, नितीन कुंभार, स्थापत्य सहाय्यक सुनील सुळ आणि पोलीस हवालदार पोपट कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

बारामती – इंदापूर रस्त्यावर पिंपळी येथे जळोचीला जाणारा रस्ता आणि इंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हॉटेल तसेच भाजी विक्रेते, चहा विक्रेते, पान टपरी अशा प्रकारे या भागांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून हे व्यवसाय उभे केले होते. त्यामुळे येथील वाहनांना त्याचा अडथळा निर्माण झाला होता. या व्यवसायाच्या नावाखाली काही व्यवसायिक या ठिकाणी अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी येथील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. बारामती-इंदापूर रस्ता हा सतत वाहतुकीचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी कायम असते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे.

  • पिंपळी ते बारामती या भागात कायमच वाहनांची जास्त गर्दी असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत चालले होते. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
    – उदय नांदखिले, कनिष्ठ अभियंता

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.