पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील बहुचर्चित असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून (दि.१२) सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. १९ एप्रिलपर्यंत असून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे. तर, मतदान दि.७ मे २०२४ला होणार आहे.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात निवडणुका पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुणे,शिरुर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि.१४ एप्रिल २०२४ पासून सुरुवात होणार आहे. मतदान दि.१३ मे २०२४ला होणार आहे. तर या चारही लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी दि. ४ जून २०२४ला होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण २३ लाख ६२ हजार इतके मतदार आहेत.