Bangladesh Election 2024 : बांगलादेशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तरीही आज शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले होते.
मतदान संपेपर्यंत ही टक्केवारी वाढून ४० टक्के झाली होती. बंगलादेशमधील निवडणुकीतील ही आतापर्यंतची नीचांकी टक्केवारी होती. २०१९ च्या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले होते.
मतदानाची टक्केवारी जरी कमी असली तरी विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात कोणीच विरोधी पक्ष निवडणुकीत उतरला नसल्यामुळे या निवडणुकीतील शेख हसिना यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. तसे झाल्यास शेख हसिना या सलग चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे.
देशभरातील मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत नैऋत्येकडील खुलना विभागामध्ये सर्वाधिक ३२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. तर इशान्येकडील सेल्हेट विभागामध्ये सर्वात कमी २२ टक्के मतदान झाले. मतदानातील गैरप्रकारांमुले ७ मतदान केंद्रांवरील मतदान स्थगित करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ४ वाजता मतदान संपले.
संपूर्ण दिवसभरात कोठेच मतदानासाठीचा विशेष उत्साह मतदारांमध्ये आढळून आला नाही. मतदान बुथवर देखील सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांखेरीज अन्य कोणीही मतदारांची गर्दी आढळली नाही. मतदान केंद्रांवर देखील गर्दी नसल्यामुळे मोठ्या रांगा लागल्याचे बघायला मिळाले नाही.
निवडणूक आयोगाने उद्योगमंत्री नुरुल मजीद महमूद हुमायून यांच्या मुलाला नरसिंगडी येथे निवडणूक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तीन मतदान केंद्रांवरील मतदान रद्द केले गेले.
चित्तगोंग येथील एका जागेवरील दोन विरोधी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये गोळीबाराची घटना झाली. त्यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. तर ढाक्यात हजारीबागेतील एका मतदान केंद्रावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आला.
देशातील ३०० मतदार संघांपैकी एकूण २९९ जागांसठी आज मतदान झाले. एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तेथीन मतदान नंतर घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २७ राजकीय पक्षांचे एकूण १,५०० उमेदवार रिंगणात उभे होते.
त्याशिवाय ४३६ उमेदवारही आपले वशिब आजमावत आहेत. विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे देशभर एकूण साडे ७ लाख पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. तर अन्य देशांमधील सुमारे १०० निवडणूक निरीक्षक देखील पाचारण करण्यात आले होते.