बांगलादेशात हिंदू महिलेवरील देशद्रोहाचा आरोप फेटाळला

अल्पसंख्यांकांचा छळ होत असल्याची ट्रम्प यांच्याकडे तक्रार

ढाका- बांगलादेशात अल्पसंख्यांकांचा छळ होत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगणाऱ्या हिंदू महिलेवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यास पंतप्रधान शेख हसिना यांनी नकार दिला आहे. बांगलादेशच्या वरिष्ठ मंत्र्याने आज ही माहिती दिली.

प्रिया साहा असे या हिंदू महिलेचे नाव आहे आणि त्या “बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्‍चन युनिटी कौन्सिल’ या संघटनेच्या सचिव आहेत. व्हाईट हाऊसमध्ये 19 जुलैरोजी आयोजित एका बैठकीला त्या उपस्थित होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या या बैठकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि त्यामुळे बांगलादेशात साहा यांच्याविरोधात संतप्त भावना व्यक्‍त झाली.

याबैठकीमध्ये बोलताना साहा यांनी बांगलादेशात 37 दशलक्ष अल्पसंख्यांक बेपत्ता झाल्याचे सांगितले. मात्र साहा यांचा दावा खोटा. सहेतूक आणि अव्यवस्थित असून त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टिकरण न मागता देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल, असे बांगलादेशातील परिवहन मंत्री आणि सत्तारुढ आवामी लीगचे सरचिटणीस ओबाइदुल कादर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

मात्र पंतप्रधान शेख हसिना यांनी साहा यांच्यावर हा आरोप ठेवण्यास नकार दिला असल्याचेही कादर यांनी आज सांगितले. साहा यांच्यावर घाईघाईने कोणतीही कायदेशीर कारवाई आवश्‍यक नसल्याचे हसिना यांनी लंडनवरून यांना कळवल्याचेही कादर म्हणाले.

साहा यांचे वक्‍तव्य अंतस्थ हेतूने प्रेरित असून त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले असल्याचे परराष्ट्र मंत्री एकेएम मोझाम्मेल हक यांनी सांगितले. त्यामध्ये खोट्या आरोपाने बांगलादेशची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र सरकारच्या परवानगीशिवाय देशद्रोहाचा आरोप ठेवता येत नसल्याचे कादर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)