नवी दिल्ली – प. बंगालधील मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या शिक्षक घोटाळ्याचे बांगलादेशमध्ये कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. घोटाळ्याची रक्कम अगोदर बांगलादेशला व नंतर हवालमार्फत अन्यत्र पाठवली गेली असल्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी वर्तवली आहे. सोबत अर्पिताचे बांगलादेशातील एका मंत्र्याशी चांगले संबंध असल्याची माहितीही उघड होत असल्याची चर्चा आहे.
अर्पिता मुखर्जी गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बांगलादेशला जाऊन आली आहे. तसेच पार्थ चॅटर्जी यांचेही बांगलादेशात बऱ्यापैकी संबंध असून त्याचीही पडताळणी केली जाते आहे. तपासात बांगलादेशातील शेख हसिना सरकारमधील एका मंत्र्यासोबतच त्या देशाच्या माजी लष्करप्रमुखांचेही नाव समोर आले आहे. त्यामुळे तपास करणारी संस्था ईडी अधिक सावध झाली असून या प्रकरणाची माहिती केंद्र सरकारला देण्यात आली आहे.
अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये रक्कम सापडली होती. ही रक्कम एका बॅगमध्ये होती व त्या बॅगमध्ये आणखी एक पांढरी बॅग होती. त्यावर बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो होता. त्यामुळे या प्रकरणाचे तार बांगलादेशपर्यंत गेले असल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले व त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. जमा केलेल्या रकमेचा मोठा भाग हवालाने बांगलादेशात पाठवण्यात आला असून बांगलादेशात जमीन आणि मालमत्ता खरेदीत ही रक्कम गुंतवली गेल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. कोलकात्यातील काही कंपन्याही या हवाला प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असून त्याचाही शोध सुरू आहे.