जालना – राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील झाले. त्यांनी शनिवारी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देऊन संबंधित घोषणा केली. परिस्थितीमुळे आणि काही प्रश्नांमुळे तो निर्णय घेतल्याचे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
खोतकर शिंदे गटाचा भाग बनणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. अपेक्षेप्रमाणे खोतकर यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझी कुठलीही नाराजी नाही. त्यांच्याशी मी निर्णय घेण्याआधी बोललो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. अडचण असेल तर तू निर्णय घेऊ शकतोस असे त्यांनी मला सांगितले, असे भावूक झालेल्या खोतकर यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मी साखर कारखाना घेतला. त्यासाठी कर्जही घेतले. तो कारखाना सुरू करण्यासाठी मदतीची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, असेही त्यांनी सांगितले. संबंधित कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी छापा टाकला. तसेच, कोट्यवधी रूपयांची मालमत्ताही जप्त केली. त्यामुळे खोतकर यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जाते.