पुण्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

पोलीस बंदोबस्त, वाहतूक सुरळीत

पुणे – शेतकऱ्यांनी दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर, मार्केटयार्ड परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर भागांत काही प्रमाणात दुकाने बंद होती. यावेळी विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन, दुचाकी फेरी काढून बंदला पाठिंबा दर्शवला.

बंदच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी पक्षातर्फे सकाळी टिळक चौकात आंदोलन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. चांदणी चौक, कोथरूड, शिवणे, वारजे माळवाडी, नवले पूल, कात्रज चौक, हडपसर, टिळक चौक, दांडेकर पूल, मार्केटयार्डात राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आंदोलने केली.

तसेच शहरातील विविध रस्त्यांवरून दुचाकी फेरी काढून बंदला पाठिंबा दर्शवला. मार्केटयार्डातील व्यापारी आणि कामगारांनी दिवसभर, तर मध्यवस्तीतील व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत बंद पाळला. सायंकाळी मात्र बहुतांश व्यवहार पूर्ववत झाले होते. अनेक ठिकाणी निदर्शकांनी व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती करीत बंदमध्ये सहभागी होण्याचा आवाहन केले.

बंदच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शहरातील महत्त्वाच्या चौकांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच दुपारपर्यंत शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठेत पोलिसांची वाहने फिरत होती. दरम्यान, खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू होती.

एसटी आणि रेल्वे सेवाही सुरू होती. पुणे रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या तसेच स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन बस स्थानकांतून सकाळपासूनच बसही वेळापत्रकानुसार धावत होत्या. मात्र, तुलनेने प्रवासी संख्या घटली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.