चंदीगड – आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अथवा एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली जातात. त्याकरता मृतदेह रस्त्यावर अथवा महामार्गावर आणून ठेवण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हरियाणा सरकार आता एक कायदा करणार आहे. अशा प्रकरणात जर कोणी दोषी आढळले तर त्यांना कैद आणि आर्थिक दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
हरियाणा शव सन्मान विधेयक हे त्याचे नाव असून या कायद्यात तशा तरतूदी केल्या गेल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाने या विधेयकावर शिक्कामोर्तब केले असून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ते मांडले जाणार आहे. निदर्शने करताना अथवा निषेध नोंदवताना मृतदेह रस्त्यावर ठेवला जातो. काही वेळा महामार्गावरही अशी आंदोलने केली जातात.
त्या मृतदेहाचा आदर राखला जावा यासाठी कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन अगोदर संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न करेल, अन्यथा तो मृतदेह पोलिसांकडून ताब्यात घेतला जाईल व त्यावर जिल्हा प्रशासनकडूनच अंत्यसंस्कार केले जातील. विधेयकात या गोष्टीवरही भर देण्यात आला आहे की संबंधितांच्या कुटुंबीयांना नोटीस दिल्यावरही त्यांनी मान्य केले नाही आणि मृतदेहाचा अवमान होत राहीला तर प्रशासनाला अत्यंसंस्काराचे अधिकार असतील आणि मृतदेह रस्त्यावर ठेवून निदर्शने करणाऱ्यांवर खटला चालवला जाईल. त्यात ते दोषी ठरल्यास एक वर्ष कैद आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
निदर्शनांसाठी मृतदेहांचा वापर करणे थांबवावे अथवा अन्य कोणाला तसा वापर करू देण्याची परवानगी दिली जाऊ नये हे थांबवण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. सामान्यत: अपघातात मृत्यू झाल्यावर, रूग्णालयात मृत्यू झाल्यावर अथवा एखाद्या कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यावर असे मृतदेह रस्त्यावर ठेवून निदर्शने केली जातात.