सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने
नायगाव- मतदानाच्या दिवशी नियमांचे पालन करा. दोनशे मीटरच्या आतमध्ये कोणीही मोबाइल वापरू नका. मतदानासाठी आवश्यक आपल्या ओळखीचा पुरावा जवळ ठेवा. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले.
पोलीस निरीक्षक माने यांनी गावभेट दौरानिमित्त पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. माने म्हणाले की, मतदानाच्या दिवशी दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करा. प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या आतमधील हॉटेल, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नका. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही. यावेळी गावातील पोलीस पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.