मुंबई – अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. तेजस्विनीने उचललेल्या या धाडसी निर्णयाचे मराठी इंडस्ट्रीमध्ये जोरदार कौतुक होताना दिसत आहे. ‘अथांग’ सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे.
‘बांबू’ची कथा तरुणाईवर आधारित असली तरी हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला हा चित्रपट भावणारा आहे. मुळात या चित्रपटात अत्यंत दिग्गज, संवेदनशील आणि जबाबदार कलाकार आहेत. बाबूमधे तेजस्विनीची झलक पाहायला मिळाल्याने आता तिची यामध्ये नेमकी भूमिका काय असणार ? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
अबिनयासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी देखिल तेजस्विनी उचलली आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, “या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप धमाल होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे”.
विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बांबू’ चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.