लंडन : बलुच नॅशनल मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी आज लंडनमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातील अपहरणाविषयी आवाज उठवण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानच्या सैन्याकडून शेकडो बलुच महिला, मुले आणि प्रौढांचे अपहरण झालेले आहे. त्यांचा कोणतही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात यावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
नसीब गुल बलोच या युवकाचे त्याच्या हनी गुल बलोच या मैत्रिणीसह 14 मे रोजी अपहरण करण्यात आले. त्याच्या मैत्रिणीला 3 महिने डांबून ठेवण्यात आले. हनी बलोच हिचा अनन्वित छळ करून नंतर सोडून देण्यात आले. पण नंतर तिला विद्यापिठातून काढून टाकण्यात आले. याचा संदर्भ देऊन आंदोलकांनी बलुच नागरिकांवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. बलुच राजकीय नेत्यांना दडपण्यासाठी पाकिस्तानातील सरकार आणि प्रशासनाकडून अपहरणाचे तंत्र अवलंबले जात आहे, असे बलुच नॅशनल मुव्हमेंटचे प्रवक्ते हमाल हैदर बलुच यांनी सांगितले.
आतापर्यंत 100 बलुच महिलांचे पाकिस्तानी सैन्याकडून अपहरण करण्यात आले आहे. या महिलांना अत्यंत बिकट अवस्थेतल्या छळ छावण्यांमध्ये डांबून ठेवले जात आहे. ही अत्यंत घातक मानवीहक्क विषयक समस्या पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आहे. त्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. ही समस्या ब्रिटीश पंतप्रधानांच्या कानावर घालण्यासाठीच ही निदर्शने केली गेली असल्याचे “बीएनएम’च्या ब्रिटन शाखेचे अध्यक्ष हकिम बलुच यांनी सांगितले.