पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आदित्य बलसेकर, आयुश भट, अर्णव पतंगे, निथीयन एरीक या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात भारताच्या आदित्य बलसेकर याने यूएसएच्या श्रेय अरोराचा 1-6, 6-4, 12-10 असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली. यूएसएच्या आयुश भटने भारताच्या जैष्णव शिंदेचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
अर्णव पतंगेने गिरीश चौगुलेवर 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. मुलींच्या गटात भारताच्या सुदीप्ता कुमार हिने सोलोमन आइसलॅंडच्या झोरिका मॉर्गनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. रिया उबवेजाने मल्लेला श्रीनाथ सीला 6-2, 6-1 असे नमविले.