नवी दिल्ली – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातल्या नौदलाच्या हवाई तळावर काल रात्री सशस्त्र बलुच दहशतवाद्यांनी हल्ला केला. तळाच्या मुख्य आवारामध्ये घुसण्याचा प्रयच्न दहशतवाद्यांनी केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान ६ दहशतवादी ठार झाले. हा हल्ला बलुचिस्तानमधील तुरबत जिल्ह्यात पाक नौदलाच्या सिद्दीक हवाई तळावर झाला होता.
नौदलाचा हा हवाई तळ देशभरातील सर्वात मोठा हवाई तळ मानला जातो, असे मकरानचे आयुक्त सईद अहमद उमराणी यांनी माध्यमांना सांगितले. दहशतवाद्यांनी या हवाई तळाच्या सीमांच्या तीन वेगवेगळ्या बाजूंनी एकाचवेळी हल्ला केला होता. मात्र सुरक्षा दलांनी वेळीच प्रतिकार करून हा हल्ला निष्प्रभ ठरवला, असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे या परिसरात रात्रभर गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, असे या परिसरातील काही साक्षीदार रहिवाशांनी सांगितले.या चकमकीमध्ये ६ दहशतवादी मारले गेले आणि ते हवाई तळ किंवा विमानांचे काहीही नुकसान करू शकले नव्हते, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित मजिद ब्रिगेड या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमांना लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये बलुच बंडखोरांकडून दीर्घ काळापासून घातपाती कारवाया केल्या जात आहेत. चीनची ६० अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेल्या सीपीइसीच्या प्रकल्पांवर बलुच दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आले आहेत.
या वर्षीचा तिसरा मोठा हल्ला…
या वर्षी आतापर्यंत पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांवर बलुच दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. यापूर्वी झालेले दोन हल्ले देखील सुरक्षा दलांनी निष्फळ ठरवले होते. या वर्षाच्या प्रारंभी दहशतवाद्यांनी माच गावावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात १० जण ठार झाले होते. मात्र माच तुरुंग फोडण्यात दहशतवाद्यांना यश आले नव्हते. तर २४ मार्च रोजी ग्वादर बंदरावरही बलुच दहशतवाद्यांनी केलेला हल्ला सुरक्षा दलांनी परतवून लावला होता. त्यावेळी ८ दहशतवाद्यांना ठार केले गेले होते.