पुणे – दुसरी एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार 23 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, पुण्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 8 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माणिकचंद ऑक्सिरिच यांनी स्पर्धेला पाठिंबा दिला असून
स्पर्धेचे संयोजन स्पोट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे करण्यात आले आहे.कोविड-19 या महामारीच्या संकटानंतर आमच्यावतीने पहिल्यांदाच अशी स्पर्धा होत असून या स्पर्धेव्दारे स्थानिक खेळाडूंसाठी आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी निर्माण होत आहे. या स्पर्धेव्दारे पुण्याच्या भागातील मुलांना एक संधी मिळत असून आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले.
स्पोट्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत गेम चेंजर्स, पीआयओसी हरीकेन्स्, स्पायडर स्पोर्टस्, किंग्ज् स्पोर्टस् क्लब, ईगल्स् क्रिकेट क्लब, सेंच्युरी क्रिकेट अकादमी, पुनित बालन ग्रुप व जीएसटी अँड कस्टम संघ या आठ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेत एकूण दीड लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रुपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला 41 हजार रुपये व करंडक मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 31 हजार रुपये आणि करंडक असे पारितोषिक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी मराठी सिने कलाकार आकाश ठोसर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धा आयोजनामध्ये कोविड-19 सुरक्षितचे सर्व नियम आणि खेळाडूंची सुरक्षितता या नियमांचे सर्व पालन करण्यात येणार आहे.