काही दिवसांनी रिलीज होणारा “बाला’ हा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या “उजडा चमन’ची कॉपी आहे, अशी टीका अलिकडे व्हायला लागली आहे. कारण हे दोन्ही सिनेमे टक्कलग्रस्त पुरुषांच्या व्यथेवर आधारलेले आहेत. पण ही टीका ऐकून “बाला’चा डायरेक्टर अमर कौशिकला खूप वाईट वाटले. “बाला’वर या टीकेचा नकारात्मक प्रभाव पडू नये, अशी त्याची अपेक्षा आहे.
“बाला’ मध्ये आयुष्मान खुराना आहे, तर “उजडा चमन’मध्ये “सोनू की टिटू की शादी’मधील सनी सिंह आहे. “उजडा चमन’ हा 2017 मध्ये आलेल्या तेलगू सिनेमा “ओन्दू मोटेया काथे’चा हिंदी रिमेक आहे. “बाला’चे शुटिंग सुरू होण्यापूर्वी दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक भेटले होते. त्यांनी आपल्याकडे एकसारखी थीम असलेली स्टोरी असल्याचे सांगितले.
“बाला’चे निर्माते दिनेश विजन यांनी मूळ तेलगू सिनेमा बघितला आणि दोन्ही सिनेमांची कथा पूर्ण वेगळी असल्याचे सांगितले. पण दोन्ही सिनेमांचे ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यात साधर्म्य असल्याचे वाटायला लागले. खूप कष्टाने आपण “बाला’ची कथा लिहील्यामुळे आपला सिनेमा म्हणजे कॉपी असल्याची टीका फार दुर्दैवी असल्याचे अमर कौशिक म्हणाला. आता “बाला’ 7 नोव्हेंबरला रिलीज झाल्यावरच तो “उजडा चमन’पासून कसा वेगळा आहे, हे समजेल.