‘महा’वादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस

आठवडाभर राहणार हीच स्थिती : पावसाचा जोर कमी-अधिक राहणार

पुणे – अरबी समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत मिळाले आहे. येत्या 48 तासांत हे वादळ दीव आणि द्वारका किनारपट्टीला धडकणार आहे.वादळाच्या प्रभावामुळे गुजरात आणि कोकण किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी अतिजोरदार तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

क्‍यार वादळानंतर आता अरबी समुद्रात “महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे वादळ सध्या तरी खोल अरबी समुद्रात असले तरी ते गुजरातच्या दिशेने वेगाने सरकत आहे. या वादळाने आपले तीव्र स्वरूप रविवारी धारण केले. सध्या हे वादळ गुजरातच्या वेरावळपासून 550 किलोमीटर तर दिवपासून 580 किलोमीटर दूर अंतरावर आहे.

या वादळाचा परिणाम पुढील दोन दिवस गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात जाणवणार आहे. त्यामुळे समुद्र खवळून अतिउंच लाटा उसळणार आहेत तर बुधवारी संध्याकाळपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात साधारणतः आठ नोव्हेंबरपर्यत पाऊस राहणार आहे.त्यानंतर मात्र राज्यात पाऊस उघडीप घेईल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.त्यामुळे एवढा आठवडा तरी पावसाचा असणारा आहे.

पुण्यात पावसाची संततधार सुरू राहणार
“महा’ वादळाचा परिणाम अद्याप जाणवू लागला नसतानासुद्धा पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध भागात पाऊस पडत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक वातावरणातील बदलामुळे असे घडत आहे. रविवारी आणि सोमवारी या दोन्ही दिवशी संध्याकाळीच पावसाने हजेरी लावली होती. त्यापूर्वी सकाळी हवेत गारठा असतो त्यानंतर दुपारी उकाडा जाणवतो आणि संध्याकाळी आकाशात ढग दाटून येतात आणि पावसाच्या सरी कोसळतात.

आजसुद्धा संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरातही जोरदार पाऊस पडला. या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत पुणे शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.