भीमाशंकर कारखान्याचा लवकरच डिस्टलरी प्रकल्प

वळसे पाटील यांची माहिती : पुढील हंगामात गाळप क्षमताही सहा हजार टनांवर नेणार

मंचर – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना सर्वाधिक बाजारभाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे, तसेच गाळपक्षमता 4 हजार 500 मेट्रिक टनावरून पुढील हंगामासाठी सहा हजार मेट्रिक टन केली जाणार आहे, अशी माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (दि. 4) दिली.

पारगाव-दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 20व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गव्हाण पूजन शुभारंभप्रसंगी वळसे पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, सुषमा शिंदे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब घुले, अक्षय काळे, दादाभाऊ पोखरकर, रमेश लबडे, रमेश कानडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, उद्योजक सदाशिव पवार, केशरताई पवार, शिवाजीराव लोंढे, कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, वसंतराव भालेराव, पुष्पलता जाधव, प्राजक्ता शिरीष रोडे यांच्यासह विविध संस्थाचे प्रतिनिधी, संतमहंत आणि कारखान्याचे संचालक, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक अशोक लक्ष्मण घुले व त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते व गव्हाणपूजन समारंभ संचालक अण्णासाहेब रघुनाथ पडवळ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या हस्ते झाले. वळसे पाटील म्हणाले गाळप हंगामाचे नियोजन 15 तारखेचे आहे; परंतु पावसामुळे हंगाम पुढे जाण्याची शक्‍यता आहे. गत गाळप हंगामात 8 लाख 12 हजार 909 टन उसाचे गाळप झाले असून 9 लाख 62 हजार 475 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. साखर उतारा 11.85 मिळाला. या हंगामासाठी उसाची मोठी कमतरता जाणवणार आहे. 5 लाख 5 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होण्याची शक्‍यता आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी प्रास्ताविकात कारखाना गळीत हंगामाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, हभप शंकर महाराज शेवाळे, हिरामण कर्डिले, संतदास महाराज मनसुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले, तर ज्ञानेश्‍वर माऊली गावडे यांनी आभार मानले.

एफआरपीपेक्षा जादा भाव दिल्याने इन्कम टॅक्‍सची नोटीस
कारखान्याने इतर खर्चात काटकसर करून बचत करण्याचे धोरण अवलंबले आहे. एफआरपी पेक्षा जास्त बाजारभाव दिल्याने केंद्र सरकारने सुमारे दोनशे कोटी रुपयांची इन्कमटॅक्‍सची नोटीस कारखान्याला पाठविली असल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)