नवी दिल्ली – भारतीय बॅडिमटन संघटनेच्या (बीएआय) निवड चाचणीत भारताचा स्टार खेळाडू बी. साईप्रणीत याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला आता आगामी काळात होत असलेल्या महत्वाच्या स्पर्धांत भारतीय संघात स्थान मिळणार नाही.
अर्थात तरीही त्याला पुढील काळात आणखी किमान दोन पात्रता स्पर्धा घेतल्या गेल्या तर पात्रता मिळवण्याची संधी मिळेल.
जागतिक क्रमवारीत 19 व्या स्थानी असलेल्या साईप्रणीतला ओडिशा खुली स्पर्धा जिंकणाऱ्या किरण जॉर्जने 21-23, 21-11, 16-21 असे पराभूत केले. यानंतर साईप्रणीतने अंसल यादववर 21-16, 21-9 अशी मात केली.
या निवड चाचणीचे आयोजन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह थॉमस आणि उबेर चषक व आशियाई क्रीडा स्पर्धासाठीच्या संघ निवडीसाठी करण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल 15 खेळाडूंमध्ये असलेल्या लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांतला भारतीय संघात थेट प्रवेश देण्यात आला आहे.