मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीला आज 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्यतेचे कारण सांगितले होते. तरिही त्यांना सुनावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेल्या मलिक यांना आज विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आपल्याला किडनीशी संबंधित आजार असल्याने आपल्या पायावर सूज आली असल्याचे मलिक यांनी न्यायालयात सांगितले.
जेंव्हा जेंव्हा आपले पाय दुखत असल्याचे आपण सांगतो, तेंव्हा तुरुंग अधिकाऱ्यांकडून आपल्याला केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. आपल्या वैद्यकीय समस्यांबाबत आपल्याला कायमस्वरुपी इलाज आवश्यक असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.
अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर 22 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे मलिक यांच्या वकिलांनीही न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने मलिक यांची न्यायालयीन कोठडी 22 एप्रिलपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले.