मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे.
आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
सध्या सगळीकडे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत असून,
या चित्रपटाने तिकीट बारीवर देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला महिला प्रेक्षक तुडुंब गर्दी करीत असल्याचं चित्र सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत बघायला मिळत आहे.
10 दिवसांत 26.19 कोटींची कमाई केल्याचं निर्माते जिओ स्टुडिओजनं जाहीर केलं आहे. राज्यभरात प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला 500 स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात स्क्रीन्सची संख्या 700 पर्यंत वाढली. सध्या आठवड्याला 750 स्क्रीन्सवर चित्रपट दाखवला जात आहे.
अभिनेता रितेश देशमुखच्या ‘वेड’नंतर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आणखी शो वाढवले जातील असं देखील चित्रपटगृह मालकांनी सांगितलं आहे.