अकोला – हिंदू दलित तरूणाचा मुस्लिम धर्मात धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगावातून समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाचं धमकावून धर्मांतर झाल्याचा आरोप त्याच्या आईनं केला आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह धमकावण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मांतर झालेल्या तरूणाचे नाव शुभम होते. आता तो आपले नाव ‘मोहम्मद अली’ असल्याचे सांगत आहे. शुभमने 21 नोव्हेंबर 2022 रोजी इस्लाम कबूल केल्याचे शपथपत्रावर लिहिले आहे. धर्मांतराची प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री गावातील मदरशात झाल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे. आपल्या मुलाला गावातील अल्ताफ गादीवाले, अन्सार गादीवाले, शेख तन्वीर, शेख अजीम शेख मंजूर या चौघांनी दबाव टाकून आणि पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरण घडवून आणल्याचा आरोप शुभमच्या आईने केलाय.
प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी या प्रकरणाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर फडणवीस यांनी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणासह गावातील इतर धर्मांतरण प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.