करोना रुग्णांची सेवा करण्याच्या अटीवरच डॉक्‍टरला जामीन

- माजी मंत्र्याला मागितली होती 30 कोटी रुपयांची खंडणी - आठवड्यातील पाच दिवस करोना रुग्णांवर करावे लागणार उपचार

पुणे – माजी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह दोघांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन 30 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोक्का कायद्याखाली वर्षभरापासून येरवडा कारागृहात असलेल्या डॉक्‍टराला विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी नुकताच 2 महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे, या डॉक्‍टराने ससून रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

डॉ. इंद्रकुमार भिसे (वय 52, रा. शिरुर) असे त्याचे आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही शर्ती टाकल्या आहेत. त्यात “डॉक्‍टराने आठवड्यातील 5 दिवस ससून रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवर उपचार करावेत. त्याने साक्षीदारांवर दबाव टाकू नये. या जामिनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर राहावे. त्यावेळी त्याने ससून हॉस्पिटलच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे,’ अशा शर्ती टाकल्या आहेत. डॉ. भिसे 4 साथीदारांना मे 2019 मध्ये ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.

देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यास मंजुरी दिली. त्यानुसार अनैक कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, डॉ. भिसेवर मोक्कासारख्या गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यांची सुटका झाली नाही. करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. भिसे यांनी स्वत: करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. त्यानुसार या अर्जाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. “ते खासगी रुग्णालयात 20 वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्‍टिस करतात. त्यांचे पुण्यात घर आहे. ते पळून जाण्याची शक्‍यता नाही,’ असे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यांच्यावतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. डॉ. भिसे याला वैद्यकीय सेवेचा अनुभव असून, त्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोग होईल, असे नमूद करत न्यायालयाने हा आदेश दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.