पुणे : गुगल प्ले स्टोअरमधून फेक कॉल ऍप डाऊनलोड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस.पाटील यांनी जामीन मंजुर केला आहे.
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20, रा. हडपसर), सुनील गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25, दोघेही, रा. थेऊर, ता. हवेली), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19, रा. फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली) अशी सहा जणांची नावे आहेत. त्यापैकी सौरभ काकडे याच्या वतीने न्यायालयात ऍड. सुधीर शहा आणि ऍड. राहुल भरेकर यांनी काम पाहिले. तर, आकाश निकाळजे याच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. याबाबत शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.