बुलडाणा – मागील काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यात नारायण राणे यांच्या कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागलं होते. आता पुन्हा एकदा संजय गायकवाड चर्चेत आले असून यावेळी ते राजकीय नव्हे तर त्यांच्या ‘बाहुबली’ अवतारामुळे चर्चेत आले आहेत.
संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. वादळामुळे रस्त्यात पडलेलं झाड बाजूला करुन त्यांनी वाट मोकळी करुन दिली. या घटनेचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
शुक्रवार 28 मेच्या रात्री बुलडाणा मतदार संघातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. याची पाहणी करण्यासाठी 29 मे रोजी आमदार गायकवाड गेले होते. सकाळी गुळभेली ते राहेरा मार्गाने जात असताना एक झाड त्यांना रस्त्यात पडलेले दिसले. त्यावेळी त्यांनी शर्ट काढून सहकाऱ्यांच्या मदतीने झाड बाजुला केले. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता.
आमदार संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार; शर्ट काढून हटवलं रस्त्यावर पडलेलं झाड @sanjaygaikwad34 pic.twitter.com/PYy4PwQD3U
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 31, 2021
आमदार गायकवाड यांचा झाड बाजुला करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वास्तविक पाहता गायकवाड या संदर्भात सरकारी यंत्रणेला आदेश देऊन झाड बाजुला करण्यास सांगू शकत होते. मात्र त्यांनी तस न करता स्वत: पुढाकार घेऊन झाड बाजुला केलं.