पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे निलख येथील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची विविध खोदकामामुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी, विविध प्रकारच्या केबल, यामुळे रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाण रस्त्यासह गल्लीतील रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, हे रस्ते पुर्ववत करण्यात आलेले नाहीत. तात्पुर्त्या स्वरुपात फक्त डागडुगी करण्यात आली. परिणामी रस्त्यावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. मागील वर्षभरापासून रस्ते खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच अनेकदा छोटे-मोठे अपघात होत आहेत. असे नागरिक सांगत आहेत.
पिंपळे निलखमधील जवळपास सर्वच गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाला आहे. महापालिका फक्त मलमपट्टी करण्याचे काम करत आहे. पिंपळे निलख परिसर स्मार्ट सिटीत येत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. – शिरीष साठे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस