पाठदुखी- पाठ न सोडणारे दुखणे 

डॉ. प्रज्ञा

पाठीत भरून आले आहे, किंवा पाठ फारच दुखते आहे या नेहमीच्या तक्रारी. महिलांच्या आणि पुरुषांच्याही. महिलांच्या थोड्या अधिकच प्रमाणात. ही पाठदुखी म्हणजे नेमके काय? ती कशामुळे होते आणि होऊ नये म्हणून वा झालीच तर काय करावे? याबाबत थोडेशी माहिती, सर्वांनाच उपयोगी पडावी अशी.

आता पाठदुखी म्हणजे काय, असा प्रश्‍न जर कोणी विचारला, तर त्याचे उत्तर असे आहे-पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे (ङुेशी इरलज्ञ झरळप), पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमध्ये पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. ही व्याधी बऱ्याचदा मानसिक ताणामुळे सुरू होते. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात, ज्यांचा पाठीच्या कण्याला आधार असतो; ते दुखावल्यामुळे किंवा त्यांच्यावर ताण आल्याने पाठदुखी होते.

पाठदुखीची व ताणाची कारणे आणि धोके : ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच शारीरिक अवस्थेमेध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. उदाहरणार्थ एखाद्याला नोकरीच्या ठिकाणी दिवसभर खुर्चीत बसावे लागते. ते पाठदुखीचे कारण होऊ शकते. त्यात तुमची बसण्याची सवय, बसण्याच्या खुर्चीचा प्रकार इत्यादी घटकांचा परिणाम होतो. सततच्या पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्‍यता असते आणि उलट प्रकारे बऱ्याचदा मानसिक ताणामुळेही पाठदुखी सुरू होते.

जेव्हा पाठदुखी मानसिक ताणामुळे नसते, पूर्णपणे शारीरिक असते आणि भयंकर वेदना देणारी असते; तेव्हा मात्र ताबडतोब डॉक्‍टरांकडे जाणे आणि गरज लागल्यास हॉस्पिटलमधे ऍडमिट होणे जरुरीचे असते. उदाहरणार्थ, पडल्यामुळे, जोराचा धक्का बसल्याने वा एखाद्या वाहन अपघातात मार बसल्याने पाठीत वेदना होतात, तेव्हा तत्काळ मदतीची आवश्‍यकता असते. तसेच अति ताण पडेल अशा प्रकारे त्रास घेऊन खूपच जास्त वजन उचलले तरीही पाठीला फ्रॅक्‍चर होऊ शकते आणि त्याचे नंतर रूपांतर पाठदुखीत होते. पाठीमधे गाठ झाली, ट्युमर झाला, किंवा कसला संसर्ग झाला तरीही पाठदुखी पाठीशी लागते. कर्करोग, ताप, संसर्ग, वजन उचलणे, अशक्तपणा ह्या सर्व समस्यांमुळे होणाऱ्या पाठदुखीबद्दल आपण ताबडतोब आपल्या डॉक्‍टरांना सांगणे अत्यंत गरजेचे असते.

पाठदुखीसाठी घ्यावयाची काळजी : खालच्या बाजूची पाठदुखी (ङुेशी इरलज्ञ झरळप) सुरू असेल आणि त्यावर आपण काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रूपांतर असह्य वेदनांत होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे आणि ते नियमितपणे करणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य तऱ्हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारीरिक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाळणे आवश्‍यक असते.

उपचार : पाठदुखीची लक्षणे जर दुखणे विकोपाला नेणारी असतील तर तत्काळ उपचार सुरू करावा. बरेच जण पाठ दुखत असेल तर झोपून राहतात, पण तसे कधीच करू नये. खरे तर ती सर्वात चुकीची पद्धत आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनामधे पाठदुखीबद्दलचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण माहितीसुद्धा अंतर्भूत असते. त्यामधे ही व्याधी वाढू न देण्यासाठी आणि कमी होण्यासाठी काय काय करावे हे डॉक्‍टर सांगतात. मानसिक ताणामुळे आलेल्या पाठदुखीची काळजी आणि दुखापतीमुळे झालेल्या पाठदुखीची काळजी ही वेगळी असते; त्यामुळे त्याची गल्लत करू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.