लंडन -ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या विम्बंल्डन टेनिस स्पर्धेला सोमवारपासून येथे प्रारंभ झाला. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत बेलारुसच्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीच्या या सामन्यात अझारेन्काने हा सामना जिंकला व दुसरी फेरी गाठली असली तरीही तीला संघर्ष करावा लागला.
तिची प्रतिस्पर्धी खेळाडू यू युआनने तिला चांगली लढत दिली. केवळ अनुभव कमी पडल्यामुळे तिला हा सामना 6-4, 5-7, 6-4 असा गमवावा लागला.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत फ्रान्सच्या डॅनी पेरीने ब्रिटनच्या हॅरीयट डार्टवर 6-7, 6-0, 6-4 अशी मात केली. अमेरिकेच्या जेसिका पेग्युलानेही दुसरी फेरी गाठताना आपल्या देशाच्या लॉरेन डेव्हीसवर 6-2, 6-7, 6-3 असा विजय प्राप्त केला.
पुरुष एकेरीत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने अपेक्षित विजयाची नोंद करत दुसरी फेरी गाठली. त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलवर 6-3, 7-5, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली.
अन्य सामन्यात इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीनेही आगेकूच करताना पहिल्या फेरीत पेरुच्या युआन पाब्लो वलीरासवर 6-3, 6-1, 7-5 असा विजय मिळवला.
स्पेनच्या बुस्काचा सनसनाटी विजय
स्पेनची स्टार खेळाडू मात्र, ग्रॅंडस्लॅम स्पर्धेचा फारसा अनुभव नसलेल्या क्रिस्टिना बुस्काने पहिल्या दिवसाचा सर्वात सनसनाटी निकाल नोंदवला. तिने पहिल्या फेरीच्या लढतीत अनुभवी रशियाच्या कॅमिला रखीमोव्हाचा 6-3, 4-6, 7-6 असा अविश्वसनीय पराभव केला.