कराड – ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने कराड तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी शनिवारी पाहणी केली. संबंधित नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
सांगली जिल्ह्याला पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला होता. तेथील नागरिकांना मोठ्या वित्तहानीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसानेही फटका दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. म्हैसकर आले होते. प्रथमत: त्यांनी सांगली विभागातील शेतीची पाहणी केली. सायंकाळी पाच वाजता ते कराड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नारायणवाडी येथील भातपीक, नांदलापूर येथील भुईमूग, सोयाबीन व ज्वारी तर मलकापूरमधील सोयाबीन पिकाची पाहणी केली.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. यावेळी उपायुक्त जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा कृषी अधिकारी महेश झेंडे, उपाविभागीय कृषी अधिकारी वेताळ यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.