कराड – कराड पालिका शहर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करत असतानाच शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या बसस्थानकातील स्वच्छतागृहे मात्र अस्वच्छ आहेत. बसस्थानकातील स्वच्छता गृहांमधील अस्वच्छतेबाबत प्रवाशी, नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने पालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शनिवारी आगाराच्या अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारांना भेटून बसस्थानकाच्या स्वच्छतेबाबत सूचना केल्या. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड शहराने देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कराड शहर ओडीएफप्लसप्लस झाले आहे, असे असताना मात्र नव्याने झालेल्या येथील बसस्थानकामधील स्वच्छतेबाबत मात्र उदासिनता दिसून येत आहे.
बसस्थानकामधील स्वच्छता गृहांमध्ये एवढ्या प्रमाणात अस्वच्छता असते की प्रवाशांना जाणेही मुश्किल होते. तसेच बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: नाक मुठीत घेवून थांबावे लागते. याबाबत अनेकदा प्रवाशी, नागरिकांनी आगाराच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत ठेकेदाराकडे बोट दाखवले. ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याने याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न नागरिकांना पडत असे. स्वच्छतागृहांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांकडून पैसे वसूल करत असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे शहर स्वच्छतेत देशात नंबर मिळवत असताना व बसस्थानक हे शहराचे मुख्य ठिकाण असताना याठिकाणी मात्र अस्वच्छता असल्याने याठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून शहराच्या स्वच्छतेबाबत साशंकता व्यक्त केली जात असे. ही बाब लक्षात आल्याने पालिकेचे आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक बाळासाहेब यादव, नोडल ऑफिसर आर. डी. भालदार, निशांत ढेकळे, मुकादम मारूती काटरे, राजू संकपाळ यांनी आगाराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली शिवाय त्यांनी ज्या ठेकेदाराकडे बोट दाखवले त्या ठेकेदारालाही स्वच्छतेबाबत सूचना देवून बसस्थानक स्वच्छ राखण्याबाबत सूचना केल्या.