झेंडेवाडीत भुईमुगाची केली पाहणी
खळद – सासवड-झेंडेवाडी या रोडलगत असणाऱ्या एका शेतातील संपूर्ण भुईमूग पीक पाण्याखाली गेले असल्याचे दिसताच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गाडी थांबवून त्या शेतात जाऊन भुईमूगाची पाहणी केली. काळेवाडी येथील शेतकऱ्यांशी नुकसानी संदर्भात त्यांनी चर्चा केली.
पुरंदर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शनिवारी (दि. 2) झेंडेवाडी, काळेवाडी, सोनोरी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहाणी केली. यावेळी त्यांना संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला तात्काळ सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी सकाळी अकराच्या दरम्यान काळेवाडी येथुन पाहणीला सुरुवात झाली. यावेळी येथे त्यांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहत असलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यानंतर पेरूच्या बागांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी फळबागांचा देखील पंचनामा केला जाईल. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, घेवडा,वाटाणा,बाजरी, ज्वारी ,फुलशेती या पिकांचाही पंचनामा करणार असल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. संपूर्ण पुणे- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तात्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न होतील. येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये सर्व पंचनामे पुर्ण होतील असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पलघरमल, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, तालुका कृषी अधिकारी अंकुश बरडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत,आर. व्ही. लाखे,एन. डी. गायकवाड,सुधीर गिरमे,हमीद शेखज जलतज्ज्ञ सागर काळे, शेतकरी देवराम काळे, संतोष काळे, बाळासाहेब काळे, लक्ष्मण काळे, बबन मांढरे, उत्तम काळे आदी उपस्थित होते.