मुंबई – मागील काही वर्षापासून ‘इंडियन आयडल’ या शोला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. नुकतेच ‘इंडियन आयडल 13’ च्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. ऋषी सिंह याने या पर्वाच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सोहळ्यात सोनाक्षी कर, बिदिप्ता चक्रवर्ती, चिराग कोतवाल, शिवम सिंह आणि देवोस्मिता हे कलाकर टॉप फायनलमध्ये होते. अखेर ऋषी सिंह ‘इंडियन आयडल 13’ चा विजेता झाला.
ऋषी सिंहला विजेतेपद मिळाल्यानंतर त्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे. तसेच मारुती सुझुकी SUV कार भेट म्हणून देण्यात आली आहे. सोबतच त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे.
विजेता झाल्यानंतर ऋषीने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, “माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. पण माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.” यावेळी त्याने नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया या तिन्ही जज आणि टीमचे आभार मानले.
उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी असलेल्या ऋषीला त्याच्या आई-वडिलांनी दत्तक घेतले होते. याबाबत त्याने स्वत: या शोमध्ये खुलासा केला होता. त्यामुळे एकंदरीतच ऋषीने आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे. सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.