मुंबई – मेसर्स महादेव ऑनलाइन बेटिंग (M/s Mahadev Online Betting) प्रकरणात ईडीने ( ed raid) आज मुंबईसह कोलकाता, भोपाळ अन्य शहरात व्यापक मोहिम राबवित छापे टाकले. या कारवाईत ईडीने सुमारे 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी 14 चित्रपट कलाकार व गायकांनी हवालामार्फत रक्कम घेतली होती.
39 ठिकाणी छापे –
याप्रकरणी ईडीने मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबईसह भोपाळ, कोलकाता परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग पचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
बाॅलिवूड स्टार ईडीच्या रडारवर
याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff), नेहा कक्कर (Neha Kakkar), सनी लिओनी (Sunny Leone), कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.
कलाकारांनी हवालामार्फत पैसे स्वीकारल्याचा संशय
त्यामुळे तेही याप्रकरणात ईडीच्या रडावर आले आहेत. याशिवाय भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचीही नावे तपासात उघड झाली आहेत. संशयीत कलाकारांनी हवालामार्फत पैसे स्वीकारल्याचा संशय आहे. त्यांना याबाबत माहिती होती का याची पडताळणी करण्यासाठी यापैकी अनेकांवर ईडी लवकरच समन्य बजावणार आहे.
योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी 18 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 13 कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.