अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरणी चौघांना जन्मठेप

नवी दिल्ली – अयोध्येत 2005 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कट रचणाऱ्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चौघांना प्रत्येकी 40 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

2005 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. अंतिम सुनावणीसाठी न्यायाधीशांनी निर्णय घेण्यासाठी 18 जून ही तारीख दिली होती. ज्यानुसार आज निर्णय घेण्यात आला. 14 वर्षांच्या कालावधीत 63 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या हल्ल्यातले दहशतवादी राम भक्त बनून अयोध्येत शिरले होते. त्यांनी या भागाची रेकी केली. त्यानंतर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर गाडीमध्ये बसून रामजन्मभूमी परिसरात आले तिथले सुरक्षेचे कडे मोडून त्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण मारले गेले होते. तर काही सुरक्षा रक्षक जखमी झाले होते.

दहशतवादी हल्ल्यातील अरशद याला त्याचवेळी ठार करण्यात आले होते. तर इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूक हे पाचजण तुरुंगात होते. ज्यापैकी मोहम्मद अजीजची मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.