अडीच लाख व्यक्तींची मेसेजद्वारे जागृती

जिल्हा परिषदेचा करोना नियंत्रण कक्ष देतोय नागरिकांना आधार

सातारा -जिल्हा परिषदेचा करोना नियंत्रण कक्षाद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख व्यक्तींना रोज सुमारे सात लाख मेसेज करून करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती केली जात आहे. त्यामुळे हा कक्ष नागरिकांना एकप्रकारे आधार ठरत आहे.

याबाबतची माहिती देताना जिल्हा परिषदेतील नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नटराज पाटील म्हणाले, “करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विविध प्रकारचे विविध गट तयार करण्यात आले आहेत. त्या गटामार्फत हे मेसेज मोबाईलवरून पाठवले जातात. जिल्ह्यातील शेतकरी, कृषी कर्मचारी ,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, प्राथमिक शिक्षक, सरपंच, उपसरपंच, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे विविध ग्रुप तयार केले आहेत. त्यांना प्रादुर्भावाची लक्षणे तसेच घ्यावयाची काळजी याबाबत सातत्याने रोज मेसेजद्वारे आठवण करून दिली जाते.”

सातारा शहरात येणारे आणि साताऱ्यातून बाहेर जाणारे यांच्यासाठी देखील वेगळा ग्रुप तयार केला आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्या क्षेत्रातील हाय रिस्क आणि लो रिस्क असणाऱ्या सहवासीाल व्यक्तींना या मेसेजद्वारे लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे, दूरध्वनी क्रमांक कळवले जातात. 1077 नंबरवरून माहिती घेण्याचे सूचित केले जाते.

रोज कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्वच गटांना मार्गदर्शन केले जाते. मास्क वापरावा, हात धुवावे, सामाजिक अंतर ठेवावे अशा प्रकारच्या सूचना रोज केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचांना या गटातून माहिती दिल्यामुळे सर्व गावापर्यंत माहिती पोहचण्यास मदत होत आहे. याशिवाय विविध लिंकद्वारे माहिती मागवण्यात येत असते.

जे स्वयंसेवक डॉक्‍टर आहेत, त्यांना देखील एक लिंकद्वारे सेवेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. सर्वच ग्रुपमधील सुमारे अडीच लाख व्यक्तींना रोज आजाराची लक्षणे सांगून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमासाठी नियंत्रण कक्षातील सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.