मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातले आहे. या कुत्र्याच्या भीतीमुळे गावात “लॉकडाऊन’ असल्यासारखी स्थिती असून, नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले आहे. याचा फायदा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अवसरी खुर्द येथे देखील बाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र, तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर फिरत होते; परंतु गावातील आठ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात कुत्र्याच्या भीतीने नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळले आहे. करोनापेक्षा कुत्र्यांची दहशत जास्त अशी परिस्थिती अवसरीत निर्माण झाली आहे.