सिडनी – करोनाच्या धोक्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी भारतीय संघ आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याला या मालिकेत सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांच्या कामगिरीला मागे टाकून विक्रम साकार करण्याची संधी आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत 17 सामन्यात नेतृत्व करताना 11 विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी कोहलीला आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने ही एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकली तर कोहलीला धोनीची बरोबरी करण्याची संधी मिळेल. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 सामन्यांत नेतृत्व करताना 14 विजय तर 21 पराभव अशी कामगिरी केली आहे, कोहलीने 17 सामन्यांत नेतृत्व करताना 11 सामने जिंकले आहेत तर 6 सामने गमावले आहेत.
फलंदजीत कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. त्यासाठी कोहलीला दोन शतकांची गरज आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके फटकावली आहेत तर, कोहलीच्या नावावर 8 शतके आहेत. तसेच कोहलीला एकदिवसीय सामन्यात 12 हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी 133 धावांची गरज आहे. कोहलीच्या नावावर 11 हजार 867 धावा आहेत.