सिडनी – भारत व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगच्या सवयीवरून निर्माण झालेले कवित्व अद्याप संपुष्टात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. आम्ही प्रथम स्लेजिंग करणार नाही पण तर भारतीय खेळाडूंनी स्लेजिंग केले तर आम्हीही शांत बसणार नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू जस्टिन लॅंगर यांनी व्यक्त केले आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत आम्ही प्रथम गैरवर्तन करणार नाही. मात्र, भारतीय खेळाडूंनी कुरापत काढली तरी पण आम्ही गप्पही बसणार नाही, असेही लॅंगर म्हणाले.
ऑस्ट्रेलियात खेळताना अनेक खेळाडू दडपणाखाली असतात. ते स्लेजिंगमुळे नाही, तर सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळायचे असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या मैदानातील व मैदानाबाहेरच्या वर्तनावरून आमच्या काही खेळाडूंवर टीका होत आहे. शाब्दिक चकमकी होतात. मात्र, संघ बैठकीत आम्ही यावर चर्चा केली आहे. आम्ही कुरापत काढणार नाही पण समोरच्या खेळाडूने स्लेजिंग केली तर आम्ही गप्पही बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.